राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा समर्थन कधीच नाही – शरदचंद्र पवार

बीड, दि.०१ (प्रतिनिधी) :- ६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे ? असा सवाल उपस्थित करीत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही तर त्याची सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांनी आज बीड येथे केली. तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका असा इशाराही त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला.
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील बागलाने मैदानावर आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. बीडच्या इतिहासात प्रथमच इतकी मोठी आणि ऐतिहासिक अशी ही सभा भर उन्हात संपन्न झाली. देशाचे पंतप्रधान मन की बात सांगतात, जन की बात मात्र सांगत नाहीत. शेतकरी, अल्पसंख्यांक, तरुणांची बात मात्र एैकून घेत नाहीत अशा शब्दांत मोदींच्या मन की बातची त्यांनी खिल्ली उडविली. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाचे काय झाले ? असा प्रश्‍न विचारतानाच या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही अशा शब्दांत टोला लगावताना या सरकारला हबाडा दाखविल्याशिवाय आता गत्यंतर नसल्याचे ते म्हणाले.
आज सत्तेचा गैरवापर चालू आहे, संचालक नसतानाही आणि कर्जावर सही नसतानाही धनंजय मुंडेंना जगमित्र सुतगिरणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, राष्ट्रवादी काँगे्रेसचे नगरसेवक तडीपार केले जात आहेत. सत्तेचा हा गैरवापर करू नका, तुमचे थोडेच दिवस उरले आहेत असा इशारा त्यांनी सरकार आणि बीडच्या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांनाही दिला. आज शेतकर्‍यांची अवस्था वाईट असल्याचे सांगताना त्यांना आधार देण्यासाठी आपण सरसकट कर्जमाफी केली होती, सध्याच्या सरकारला मात्र नीट कर्जमाफीही करता आली नाही. शेतकर्‍यांना आधार द्यायचा असेल तर संपूर्ण कर्जमाफी द्या अशी मागणी श्री.पवार यांनी केली.
राफेल प्रकरणी पुरावा नाही म्हणून मी कोणाचे नाव घेणार नाही मात्र राफेलची खरी किंमत देशाला समजली पाहिजे, बोफोर्सच्या प्रकरणात आरोप झाले तेंव्हा राजीव गांधी त्याला सामोरे गेले. आजच्या सरकारला चौकशीची भिती का वाटते ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.जयदत्तअण्णा क्षीरसागर, माजीमंत्री प्रकाशदादा सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, माजी आ.राजेंद्र जगताप, आ.रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक नेते संदीपभैय्या क्षीरसागर, विजयसिंह पंडित, अक्षय मुंदडा, अजय मुंडे, जयसिंग सोळुंके, ज्येष्ठ नेते रविंद्र क्षीरसागर, डी.बी.बागल, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे, अप्पा राख, सतिष शिंदे, बापूसाहेब डोके, अशोक डक, राजेश्‍वर चव्हाण, नंदकिशोर मुंदडा, भारतभूषण क्षीरसागर, सुभाष राऊत, हेमंत क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, चंपावतीताई पानसंबळ, सौ.रेखाताई फड, सौ.सरोजिनीताई हालगे, बाजीराव धर्माधिकारी, लक्ष्मण पौळ, बबन गवते आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
परिवर्तनाची सुरुवात बीडपासून – जयंत पाटील
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमधील परिवर्तनाची सुरुवात आज बीडमधून यशस्वी विजयी संकल्प मेळाव्याने होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडच्या सर्वपक्ष पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.
पेट्रोल आणि डिझेलची शतकासाठी शर्यत- धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी
या सभेत धनंजय मुंडे यांनी नेहमीच्या शैलीत तुफान टोलेबाजी करून सभा चांगलीच गाजवली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये शतकासाठी जशी शर्यत असते तसे भावाचे शतक कोणाचे आधी पूर्ण होते यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शर्यत सुरु असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढण्याची घोषणा करून फसवणुक करण्यात आली. जिल्ह्याला कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचे नुकसान मिळाले नाही, पिक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाली तरी त्याचे व्याज मात्र जिल्हा बँकेचे चेअरमन खात असल्याचा घनाघात त्यांनी केला. जिल्ह्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, शेतकर्‍याला शेतात काही नाही, घरात काही नाही आणि सरकार फक्त घोषणा देण्याचे काम करत आहे. देशाच्या चौकीदारानेच १२५ कोटी जनतेला फसवले, आरक्षणाच्या नावावर मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला फसवले असल्याचे ते म्हणाले. आजच्या सभेने मागच्या सर्व सभांचे रेकॉर्ड ब्रेक झाले असून जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या सहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कोठे आहे विकास – अमरसिंह पंडित
या सभेत बोलताना माजी आ.अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्याचे प्रश्‍न मांडताना राज्य आणि केंद्रात सत्ता असतानाही कोठे आहे विकास असा सवाल उपस्थित केला तर हे सरकार फसवे असल्याचा घणाघात माजीमंत्री प्रकाशदादा सोळुंके यांनी घातला.
आयुष्यभर पवारांच्या पाठिशी – संदीप क्षीरसागर
आपण आयुष्यभर श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठिशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू असे युवकनेते संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी आ.जयदत्त क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा, सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, बाळासाहेब आजबे यांचीही भाषणे झाली.
सतिष शिंदे यांचा प्रवेश
आष्टी तालुक्यातील भाजपा युवक नेते, जिल्हा परिषद सदस्य सतिष शिंदे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
सभेचे क्षणचित्रे ः
* बीडमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक सभा झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात होती. शहरात सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत संपूर्ण शहरभर मानसेच मानसे दिसत होती. संपूर्ण सभामंडप सभेपूर्वीच भरून गेला होता.
… आणि पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना सावली दिली
सभा सुरु झाल्यानंतर सभामंडप भरून गेल्याने हजारो कार्यकर्ते उन्हात मंडपाबाहेर उभे होते. पवार साहेबांना झेड सुरक्षा असल्याने समोरच्या डी झोन मध्ये मात्र पोलिसांशिवाय कोणीही नव्हते त्यामुळे पवार साहेबांनी धनंजय मुंडे यांना सूचना देवून उन्हात उभ्या राहिलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सुरक्षेची परवा न करता डी झोन मध्ये बसण्यास सांगितले, त्यामुळे कार्यकर्त्यांना सावली तर मिळालीच त्याचबरोबर श्री.पवार हे कार्यकर्त्यांची किती काळजी घेतात हेही आज बीडकरांना अनुभवयास मिळाले.

Leave a Reply